पाटणा - आगामी काळात विरोधक एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आणखी एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीला अंतिम रूप येईल. विरोधकांमध्ये मतभेद नाहीत. देशहितासाठी सगळे एकत्र येत आहेत. आजच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील आव्हानांना एकत्र सामोरे जाणार असल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली.
या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आजच्या बैठकीत सर्व नेते एकत्रित आले. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व विरोधक एकजूट झाले. पुढील निवडणुका कशा लढायच्या याबाबत कॉमन अजेंडा बनवण्यात येईल. त्यानंतर पुढील महिन्यात १० किंवा १२ जुलैला हिमाचल प्रदेशातील शिमला इथं पुन्हा विरोधकांची बैठक होईल. वेगवेगळ्या राज्यात आम्हाला समान कार्यक्रमाची भूमिका घ्यावी लागेल. सर्व रणनीती आखून निर्णय घेऊ. हीच एकजूट ठेऊन २०२४ ची निवडणूक लढायची आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढायचा यात आम्हाला यश आले. आजची बैठक नितीश कुमार यांनी बोलावली, त्यांचे धन्यवाद देतो. भारत जोडो यात्रेतून आम्ही ज्याज्या ठिकाणी गेलो तिथले सगळे नेते आजच्या बैठकीला उपस्थित झालेत असं खरगेंनी सांगितले.
तसेच भारताच्या पायावर आक्रमक होतेय, ही विचारधारेची लढाई आहे. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. आमच्या नक्कीच मतभेद आहेत परंतु आम्ही एकत्र काम करू, विचारधारेचं रक्षण करू असं आम्ही ठरवलंय. आज जी बैठकीत चर्चा झाली, त्यावर आणखी विचार विनिमय होईल. विरोधकांची ही बैठक आणखी पुढे जाईल असं राहुल गांधी म्हणाले.
तर पाटण्यातून जी सुरुवात होते त्याचे पुढे जनआंदोलन होते, दिल्लीत आमच्या बैठका झाल्या पण निष्फळ ठरल्या. आता पाटणातून बैठकीला सुरूवात झालीय. आम्ही सगळे एक आहोत. आम्ही एकत्रितपणे लढाईला सामोरे जाऊ. आम्ही देशाचे नागरिक, देशभक्त आहोत, मणिपूर जळण्याने आम्हालाही वेदना होतात. भाजपाचं हुकुमशाही सरकार आहे. भाजपाविरोधात जो बोलेल त्यांच्याविरोधात ईडी, सीबीआयचा वापर केला जातो. तपास यंत्रणांचा दबाव आणून विरोधकांना दाबले जाते. बेरोजगारी, सामान्य जनतेचा विचार नाही. आर्थिक समस्येवर बोलत नाही. विकास निधी दिला जात नाही. भाजपा जितके काळे कायदे आणतील त्याविरोधात एकत्रित लढाई करू. रक्त सांडले तरी चालेल देश वाचवू असं ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर म्हटलं.