CronaVirus News : देशात प्रत्येकाची कोरोना चाचणी होणे आवश्यक : पूनावाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 01:16 AM2020-07-12T01:16:48+5:302020-07-12T01:17:07+5:30
CronaVirus News : या लसीचे संशोधन व उत्पादनावर मोठी गुंतवणूक करण्याचे आम्ही ठरविले आहे. ते म्हणाले, कोरोनावर प्रतिबंधक लस शोधल्यानंतर ती देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला आणखी एक वर्ष लागेल.
नवी दिल्ली : देशातील प्रत्येकाची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात सुरक्षित असल्याची भावना निर्माण होईल. देशात दररोज होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढवायला हवे, असे सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पूनावाला यांनी सांगितले.
पूनावाला हे व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडिया या संस्थेचेही प्रमुख आहेत. ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीचे लक्षावधी डोस जगाला हवे असतील तर त्यातील काही लसींच्या उत्पादनाला आॅगस्ट-सप्टेंबरपासून सुरुवात करावी लागेल. आम्ही तयार करत असलेल्या लसीबाबतही असाच विचार केला आहे. या लसीचे संशोधन व उत्पादनावर मोठी गुंतवणूक करण्याचे आम्ही ठरविले आहे.
ते म्हणाले, कोरोनावर प्रतिबंधक लस शोधल्यानंतर ती देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला आणखी एक वर्ष लागेल. त्यामुळे सर्वांना ही लस उपलब्ध होण्यास किमान दीड वर्ष तरी लागेल. या सर्वांचा मध्यबिंदू काढायचा झाल्यास देशात लस सर्वांपर्यंत पोहोचण्यास किमान दोन वर्षे लागू शकतात. कोरोनाचा संसर्ग झालेल्या ७० ते ८० टक्के लोकांमध्ये या आजाराची कोणतीच लक्षणे जाणवत नाहीत. उत्तम आरोग्य असेल तर कोरोना विषाणूचा फारसा परिणाम जाणवत नाही. लस उपलब्ध होईपर्यंत अनेकांचा आजार बरादेखील झालेला असेल.
आयसीएमआरच्या पत्रावरून गदारोळ नको
इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था भारत बायोटेक या कंपनीच्या सहकार्याने बनवीत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या चाचण्या लवकर पूर्ण केल्यास १५ आॅगस्टपासून ही लस उपलब्ध करता येईल, असे पत्र आयसीएमआरच्या संचालकांनी सहभागी संस्थांना पाठविले. त्यावरून माजलेल्या गोंधळाबद्दल अदर पुनावाला यांनी सांगितले, या पत्रामधील मजकुराचा विपर्यास करण्यात आला आहे. आम्ही प्रयोग वेगाने व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहोत. लसीच्या प्रयोगांचे निष्कर्ष काय येतात याची सर्वांनी शांतपणे वाट पाहावी. आयसीएमआरच्या पत्राच्या मुद्द्यावरून इतका गदारोळ माजविला जाऊ नये.