जयपूर - राजस्थानमध्ये यंदाही विधानसभा निवडणुकांच्या इतिहासाची पुनरावृत्त होणार असल्याचे एक्झिट पोलवरुन दिसून येते. टाईम्स नाऊ आणि सीएनएक्स यांच्या सर्वेक्षणातून राजस्थानमध्येकाँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे दिसून येते. विधानसभेच्या 199 जागांपैकी काँग्रेसला 105 जागांवर विजय मिळणार आहे. तर भाजपाला 85 जागांवर विजय मिळेल. त्यामुळे राजस्थानमधून भाजपाला एक्झिट घ्यावी लागणार असल्याचे दिसून येते.
राजस्थान विधानसभा निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक होती. तर, राज्यातील भाजपाची सत्ता जाईल, असे भाकितही अनेक सर्वेक्षणांमधून वर्तवण्यात आलं आहे. आता, एक्झिट पोलमध्येही भाजापाला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये कांग्रेस 119-141, भाजपा 55-72 जागांवर विजयी होईल. त्यामुळे राजस्थान मध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करेल, असेच दिसते.
जन की बात या वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणात भाजापाला विजयी घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार भाजापाला 83-103 जागा मिळतील. तर, काँग्रेसला 81-101 जागांसह आघाडी मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 4-8 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपाचा पराभव किंवा काँटे की टक्कर, असाच सर्वेक्षणाचा अंदाज आहे. टाईम्स नाऊच्या सर्वेक्षणात स्पष्टपणे भाजपाला विजयी घोषित करण्यात आले आहे.
राज्यात 1951 पासून आतापर्यंत 14 वेळा निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये चार वेळा भाजपा, एकदा जनता पार्टी आणि 10 वेळा काँग्रेसने सरकार स्थापन केले आहे. मात्र, 1993 नंतरच्या निवडणुकांमध्ये प्रत्येकवेळी सत्तापालट झाला आहे. यामुळे गेल्या 25 वर्षांपासूनचा प्रघात मोडीत निघेल या आशेवर भाजपा तर सत्तापालटाच्या आशेवर काँग्रेस निवडणूक लढवत आहेत. राजस्थानमध्ये सन 2013 मधील निवडणुकीमध्ये 58 पक्षांनी निवडणूक लढविली होती. भाजपा सर्व 200, काँग्रेस 195 आणि बसपा 190 जागांवर निवडणूक लढवित आहे. आम आदमी पार्टीने 30 जिल्ह्यांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. नव्या पक्षांमध्ये जन अधिकारी, हिन्द काँग्रेस. जनतावादी काँग्रेस, भारतीय पब्लिक लेबर, अंजुमन आणि आरक्षणविरोधी पक्षांचा समावेश आहे. यावेळी 88 पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत.