EXIT POLL : मध्य प्रदेशमधून भाजपाची एक्झिट? पण अटीतटीच्या लढतीचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:02 PM2018-12-07T18:02:01+5:302018-12-07T18:20:46+5:30
पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध होऊ लागले आहे.
नवी दिल्ली - पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध होऊ लागले आहे. दरम्यान, सर्वांचे लक्ष लागलेल्या मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी टक्कर होण्याची शक्यता सर्वच एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, टाइम्स नाऊ-सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपा सलग चौथ्यांदा सत्ता राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया आणि रिपब्लिक- सीवोटर राज्यात काँग्रेस आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
टाइम्स नाऊ-सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला 126 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 89, बसपाला 7 आणि इतरांना 9 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडियाने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यातून भाजपाची सत्ता जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 104 ते 122 तर भाजपाला 102 ते 120 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रिपब्लिक- सीवोटरनेही मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्तेतून एक्झिट होईल, असा अंदाज वर्तलवला आहे. या पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 110 ते 126 तर भाजपाला 90 ते 106 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर इथे इतरांना 6 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे.
एबीपी न्यूज-लोकनीतीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपाचा दारुण पराभव होणार असून, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 126, तर भाजपाला केवळ 94 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.