Exit Poll : गुजरातमध्ये पुन्हा फुलणार कमळ, राहुल गांधींचे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 06:18 PM2017-12-14T18:18:52+5:302017-12-14T21:37:34+5:30
होम ग्राऊंड टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारामध्ये संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मोदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी राहुल गांधी झंझावाती प्रचार केला.
अहमदाबाद - होम ग्राऊंड टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारामध्ये संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मोदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी राहुल गांधी झंझावाती प्रचार केला. याच पार्श्वभूमीवर आता सर्वेक्षणांचे आकडे समोर आले आहेत. इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून भाजपला गुजरातमध्ये 99-113 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला 68-82 जागा मिळतील असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 116 आणि काँग्रेसला 60 जागा जिंकण्यात यश आले होते.
पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकूर व दलित नेता जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केले. राहुल गांधी यांच्या प्रचारसभांनाही अनपेक्षित प्रतिसाद मिळाला होता. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड लागल्यावर ही पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेसनेही कंबर कसली. यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये 30 पेक्षा जास्त प्रचारसभा घ्याव्या लागल्या.
कोणाला किती जागा मिळणार?
- भाजप – 99-113
- काँग्रेस – 68-82
- इतर - 1-4
कोणाला किती टक्के मतदान
- भाजपा - 47
- काँग्रेस - 42
- अन्य- 11
गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात 89 जागांवर विक्रमी मतदान झाले होते. जवळपास 67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होत असून यात अहमदाबाद, बडोदा यासारख्या शहरांचा समावेश आहे. 2012 च्या निवडणुकीत 93 पैकी 52 जागांवर भाजपचा विजय झाला होता. तर काँग्रेसला ३९ जागांवरच समाधान मानावे लागले होते. गेल्या निवडणुकीत अहमदाबाद, बडोदा या शहरांमधील 23 पैकी 20 जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील बालेकिल्ला टिकवणे भाजपला जड जाणार नाही, असे दिसते. दुसरीकडे अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होणार आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि काँग्रेसचे जिवाभाई पटेल यांच्यात मेहसाणात अटीतटीची लढत आहे.