मुंबई - तेलंगणात विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा टीआरचाच गुलाल उधळणार असल्याचे एक्झिट पोलवरुन दिसून येते. दक्षिणेत भाजपाला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतल्या. मात्र, एक्झिट पोलमध्ये तेलुगू जनतेनं पुन्हा एकदा टीआरएला कौल दिला आहे. तर, भाजापाला स्पष्टपणे नाकारले आहे.
टाईम्स नाऊ या वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार तेलंगणात पुन्हा एकदा टीआरएसच्या चंद्रशेखर राव यांचीच सत्ता येईल. या सर्वेक्षानुसार केसीआर यांच्या टीआरएस पक्षाला 66 जागांवर विजय मिळेल. त्यामुळे 119 संख्याबळ असलेल्या विधानसभेत 66 जागांसह टीआरएसला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. तर भाजपाला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेस अन् टीडीपी आघाडीला 37 जागा मिळतील असा अंदाज असून इतर 2 असा 119 जागांसाठीचा एक्झिट पोल सर्व्हे आहे.
तेलंगणा - विधानसभा : 119 जागा
टीआरएस - 66
काँग्रेस आघाडी - 37
भाजापा - 07
इतर - 02
तेलंगणातील विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष असलेल्या टीआरएसने 2014 साली सत्ता मिळवली होती. 2014 साली तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसने स्पष्ट बहुमत मिळवले होते. पण, काही दिवसांपूर्वीच तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्यात आली. मागच्या निवडणुकीत 119 सदस्यसंख्या असलेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 90, काँग्रेस 13, एमआयएम सात, भाजप पाच, टीडीपी तीन आणि सीपीआय (एम) ने एका जागेवर विजय मिळवला होता.