मेघालयात खाणीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांना चमत्कार घडण्याची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:38 AM2018-12-27T05:38:33+5:302018-12-27T05:38:50+5:30
मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
गुवाहाटी : मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. काहीतरी चमत्कार घडून हे सारे जण बचावतील, अशी आशा त्यांच्यापैकी काही जणांच्या नातेवाईकांना अजूनही वाटत आहे.
या राज्यातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणींमध्ये बेकायदेशीररीत्या खाणकाम केले जाते. तेथील एका खाणीत अशाच प्रकारे बोगदा खणत असताना ही दुर्घटना घडली. मेघालयाचे आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री केरमेन शीला यांनी सांगितले की, देव काहीतरी चमत्कार घडवेल व या साऱ्यांना वाचवेल, अशी आशा वाटते.
खाणीशेजारच्या नदीतून आणखी पाणी बोगद्यात घुसल्याने रविवारी बचावकार्य तात्पुरते थांबविण्यात आले होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे १०० जवान या खाणीच्या जवळच तळ ठोकून आहेत. बचावकार्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होत नसल्याने या कामात खूप अडचणी येत आहेत.
या खाणीत अडकलेल्या पंधरा कामगारांमध्ये सात जण पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील आहेत. त्याशिवाय त्यात आसाममधील पाच, जिथे ही दुर्घटना झाली त्या लुमथारी गावातील तीन जणांचाही समावेश आहे. या कामगारांपैकी एकही जण बचावणार नाही, असे खाणीत अडकलेल्यांपैकी काही जणांच्या नातेवाईकांना वाटते, तर काही जणांना चमत्कार घडून सगळे सुखरूप परततील, अशी आशा
आहे. (वृत्तसंस्था)
कॅमेºयांसमोर पोझ देणे मोदींनी थांबवून त्यांना वाचवावे : राहुल गांधी
नवी दिल्ली : बोगीबिल पुलाच्या बांधणीबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेणे, कॅमेºयांसमोर पोज देणे या गोष्टी करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयातील कोळसा खाणीमध्ये अडकलेल्या १५ जणांना वाचवावे, असे कळकळीचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. या खाणीमध्ये घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेले उच्च दाबाचे पंप देण्यास मोदी सरकारने असमर्थतता दर्शविली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आसाममधील पुलाचे श्रेय घेण्याकरिता सरसावलेल्या मोदींना त्याच्या शेजारील मेघालय राज्यात १५ जण खाणीत अडकले आहेत, त्यांना तिथे मोकळा श्वास घेणेही कठीण जात आहे याचे काहीही सोयरसुतक नाही.
मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील कोळसा खाणीत १३ डिसेंबरपासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे त्या राज्याच्या गृहखात्याने म्हटले आहे. येथील कोळसा खाणींत बेकायदा खाणकाम चालते. त्यासाठी बालमजुरांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या गोष्टी रोखण्यासाठी यापूर्वी केंद्र सरकारने पावले उचलली होती.