नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर असंख्य मेसेज हे सातत्याने व्हायरल होत असतात. अनेकदा त्यातील सर्वच मेसेज हे खरे असतात असं नाहीच तर काही मेसेज हे अफवा पसरवणारे, फेक असतात. अशावेळी असे खोटे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं हे अत्यंत गरजेचं आहे. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये सरकार एका नवीन योजनेंतर्गत लोकांना चार हजार रुपये देणार असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेच्या नावाने एक योजना सुरू केली. योजनेत नोंदणी केल्यावर सर्व लोकांना चार हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे.
सरकारने अशी कोणातीही योजना आणली नसून अशा प्रकारची चुकीची माहिती देणारी वेबसाईट पूर्णपणे खोटी आणि बनावट आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच लोकांना सावध देखील केलं आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबत लोकांना अलर्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नावे अशाप्रकारे बनावट मेसेज बनवून लोकांची फसवणूक केली जात आहे. असा मेसेज आल्यास तुम्ही फसू नका असं म्हटलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या एका ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका बनावट वेबसाईटवर दावा केला जातो की, मोदी सरकार चार हजार रुपये देणार आहे.
लोकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा
केंद्र सरकार या नावाची कोणतीही योजना चालवत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नावाने ही फसवणूक सुरू आहे. लोकांना या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हीही त्यापासून दूर राहिले पाहिजे आणि तुमची वैयक्तिक माहिती, विशेषत: बँक खात्याचा तपशील, अशा बनावट वेबसाईटवर कधीही शेअर करू नका. कोरोना साथीच्या काळात फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत आहेत. बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करण्याचा हा एक मार्ग आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटर हँडलवर या बनावट वेबसाईटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न
कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल होत होते. PIB ने या काळात खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.