नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जगातील अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क (Mask) लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या या संकटात मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे.
मास्कमुळे शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये "माणसाला दिवसभरात 550 लीटर ऑक्सिजनची गरज असते जी नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. मात्र आता मास्कमुळे आपण फक्त 250 ते 300 लीटर ऑक्सिजन घेऊ शकतो. जास्त वेळ चेहऱ्यावर मास्क लावल्यामुळे शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिजनची पातळी खालवते. त्यामुळे सतत मास्क वापरणे धोकादायक ठरू शकतं. सतत मास्क वापरल्यामुळे गंभीर समस्येला सामोरं जावं लागू शकतं" असं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र हा दावा पूर्णतः खोटा असल्याची माहिती आता समोर आली आहे.
व्हायरल होणारा मेसेज फेक आणि चुकीचा
प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या (Press Information Bureau) फॅक्ट चेक टीमने या व्हायरल मेसेजची पडताळणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांना हा व्हायरल होणारा मेसेज फेक आणि चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. "मास्कचा वापर केल्यामुळे ऑक्सिजन पातळी खालवत असल्याचा मेसेज फेक आणि खोटा आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नये. हा दावा पूर्णतः खोटा आहे. याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर नक्कीच करा. सुरक्षित अंतर पाळणं आणि हात वारंवार धुणं हे उपाय परिणामकारक आहेत" अशी माहिती पीआयबीने दिली आहे.
परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला
कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने सात कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन मिळण्यास उशीर झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील सात रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला.