हरीश गुप्ता ।
नवी दिल्ली : बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या राज्याचे भाजपचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील रणनीती ठरविण्यासाठी लवकरच पाटणा व त्यानंतर दिल्ली येथे जाणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकांत जनता दल (यू)ने फक्त १०२ जागा लढवाव्यात असा आग्रह भाजपतर्फे धरला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाटणा येथे जाऊन त्यानंतर फडणवीस आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला रवाना होतील. गेल्या लोकसभा निवडणुकांच्या काळात भाजपला जनता दल (यू)साठी बिहारमधील लोकसभेच्या पाच जागा सोडाव्या लागल्या होत्या. आता तसे कोणतेही बंधन घालून घेण्यास भाजप तयार नाही. कोरोना साथ तसेच स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, पूरामुळे ओढविलेले संकट यांचा सामना नितीशकुमार सरकार यशस्वीरित्या करू शकलेले नाही. त्याबद्दलची आपली मते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पक्षश्रेष्ठींना कळविली असल्याचे समजते. नितीशकुमार यांच्या जनता दल (यू) पक्षाला ११८ विधानसभा जागा लढविण्याची इच्छा आहे. मात्र एकूण २४३ जागांपैकी भाजपला १०२ जागांवर लढण्याची इच्छा असून इतर ३९ जागा लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्थानी अवाम मोर्चा व अन्य पक्षांना देण्याचा विचार आहे.भाजपची नेपथ्यरचनामुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान सातत्याने टीका करीत असतात. त्यांच्या या भूमिकेला भाजपचा आतून पाठिंबा आहे, असे म्हटले जाते. हिंदुस्थानी अवाम मोर्चाला भाजपने एनडीएमध्ये आणले आहे. राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाह यांना राजद-काँग्रेसची साथ सोडण्यास भाजपनेच भाग पाडले, अशी चर्चा आहे.