नवी दिल्ली : पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर आता संसदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. संसदेतील राज्यसभेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक निवेदन सादर करून भीमा कोरेगाव प्रकरणी राज्य सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.गेल्या दोनशे वर्षात जे घडले नाही ते भीमा कोरेगावमध्ये घडले. भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश आले. याप्रकरणी राज्य सरकारने अधिक लक्ष द्यायला हवे होते, असे शरद पवारांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात लवकरात लवकर शांतता नांदावी यासाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.शरद पवार यांच्यासह नरेश अग्रवाल, डी. राजा, कनिमोझी, संजय राऊत, अमर साबळे, संभाजी राजे छत्रपती, व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास आठवले यावेळेस बोलताना म्हणाले, ही अत्यंत निंदनीय घटना असून याचा सर्व पक्षांनी आपली राजकीय भूमिका सोडून निषेध केला पाहिजे. दरवर्षी दलितांवर हल्ले होण्याच्या 45 हजार घटना घडतात. सर्व सरकारच्या काळामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही एका पक्षाच्या सरकारला यासाठी दोषी धरता येणार नाही. यासाठी दोषी असणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे.
भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 4:08 PM