राम मंदिरासाठी VHP ठोठावणार खासदारांचे दार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 05:27 PM2018-11-15T17:27:34+5:302018-11-15T17:27:40+5:30
विश्व हिंदू परिषदेचे नेते अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी देशातल्या 543 खासदारांची भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली- विश्व हिंदू परिषदेचे नेते अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी देशातल्या 543 खासदारांची भेट घेणार आहेत. यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी काही काळही निश्चित केला आहे. 25 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान या खासदारांच्या भेटीगाठी घेण्यात येणार आहेत. सर्व खासदारांच्या भेटी घेऊन विहिंप राम मंदिराच्या निर्माणासाठी कायदा करण्याची मागणी करणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात खासदारांनी राम मंदिराचा कायदा बनवण्यासाठी समर्थन द्यावं, अशी विहिंपला आशा आहे.
11 डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात प्रमुख मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिराच्या निर्माणासाठई अध्यादेश आणून कायदा बनवण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषदे(विहिंप)सह अनेक संघटना राम मंदिराच्या निर्माणासाठी रॅली काढणार आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच रामलीला मैदानात 9 डिसेंबर रोजी एक विशाल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये आठ लाख लोक सहभागी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ज्यात मोठ्या संख्येनं साधू-संतांचा सहभाग असेल. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये आरएसएसचे मोठे नेते सहभागी होणार आहेत.