आरटीआय कार्यकर्त्याच्या मुलाविरुद्ध खोटा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 02:34 AM2020-08-09T02:34:04+5:302020-08-09T02:34:13+5:30
बिहारातील घटना; पित्याची तक्रार
पाटणा : माहिती अधिकाराचा वापर करून बिहार सरकारच्या योजनांतील भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मुलास बिहार पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे प्रकरण समोर आले आहे. १४ वर्षे वयाच्या या मुलास सज्ञान असल्याचे दाखवले असून, मागील पाच महिन्यांपासून तो बक्सार तुरुंगात खितपत पडला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्त्याने सांगितले की, आपला १४ वर्षे वयाचा मुलगा २९ फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा देऊन आपल्या गावातील दोन व्यक्तींसोबत मोटारसायकलीवरून गावी परतत होता. राजपूर पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून अटक केली. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल सापडल्याचा आरोप ठेवून पोलिसांनी त्यांना बक्सार तुरुंगात पाठवले. नंतर त्याच्यासोबतच्या दोन व्यक्तींना जामीन मिळाला. मुलाच्या जामिनास मात्र पोलीस विरोध करीत आहेत. त्यामुळे तो पाच महिन्यांपासून तुरुंगात आहे. अल्पवयीन असतानाही पोलिसांनी मुलाला सज्ञान दाखविले. शाळेच्या रेकॉर्डनुसार त्याचा जन्म एप्रिल २00६ चा आहे. आपण मागील पाच वर्षांपासून अनेक आरटीआय याचिका दाखल करून बिहार सरकारच्या योजनांतील भ्रष्टाचार उघड करीत आहोत. त्यामुळे पोलिसांच्या वतीने आपल्या मुलास खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केला आहे.
राजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश प्रसाद यांनी सांगितले की, माझी यात काहीच भूमिका नाही. मला जे सांगण्यात आले, ते मी केले आहे.
या प्रकरणी पीडित मुलाच्या पित्याने राज्याच्या पोलीस संचालकांपासून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. तथापि, अजून त्याच्या मुलाची सुटका होऊ शकलेली नाही.