भेदरलेल्या त्या मुलीच्या कुटुंबीयांनी सोडले गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:43 PM2018-04-13T12:43:50+5:302018-04-13T12:43:50+5:30
जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात संताप आणि निषेधाचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेनंतर भेदरलेले पीडित आसिफाचे कुटुंबीय...
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात संताप आणि निषेधाचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेनंतर भेदरलेले पीडित मुलीचे कुटुंबीय कथुआमधील रसाना हे आपले गाव सोडून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. बार असोसिएशनने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोध आणि संप पुकारल्याने आसिफाचे कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली होते.
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार या मुलीचे वडील मोहम्मद युसूफ पुरवाला आपली पत्नी, दोन मुले आणि पाळीव प्राण्यांना घेऊन अज्ञात स्थळी गेले आहे. याआधी या मुलीचे कुटुंबीय पुढील महिन्यात काश्मीर सोडणार असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, फुटीरतावादी हुर्रियत काँन्फ्रन्सचे नेते मीरवाईज उमर फारुख यांनी राज्यातील प्रशासन आणि पोलीस या प्रकरणाकडे मुकाट पाहत आहेत, असा आरोप केला होता. तर जम्मू बार असोसिएशनने भीम सिंह यांच्या नेतृत्वाखालील पँथर्स पार्टीच्या मदतीने गुरुवारी बलात्कारी आणि आसिफाच्या खुन्यांना पाठिंबा देण्यासाठी शहरात बंद पुकारला होता.
कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षे वयाच्या बालिकेवरील बलात्कार हत्याप्रकरणी आरोपींना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये वकील तसेच अन्य काही संघटना आंदोलने करीत असल्या, तरी झालेला अतिशय घृणास्पद होता आणि त्याचे समर्थन करताच येणार नाही, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.
बालिकेचे आठ वर्षे वयाच्या १० जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण झाली आहे, असे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. मारेक-यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये आंदोलने सुरू आहेत, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने चालू आहेत.
ही मुलगी आपल्या घराजवळ घोड्यांना चारा देत असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. हे कारस्थान महसूल विभागातील निवृत्त अधिकारी सांजीराम याने रचले होते असे नमूद करून, आरोपपत्रात म्हटले आहे की, रस्साना गावातून बकरवाल जमातीच्या लोकांना हाकलून लावण्यासाठी सांझीराम प्रयत्नशील होता. बकरवालांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने हे केले. त्यात त्याने भाच्यालाही सहभागी करून घेतले. या प्रकरणी पोलिसांनी सांझीराम, त्याचा मुलगा विशाल जांगोरा, भाचा, भाच्याचा मित्र, पोलीस उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल, आणखी दोन पोलीस अधिकारी अशा आठ जणांना अटक केली आहे.