नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी संघटनांनी आता येत्या ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक दिली आहे.
शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत सुरू असलेली चर्चा देखील फोल ठरत असल्याचं दिसून येत आहे. केंद्रासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हरविंदरसिंग लखोवाल यांनी ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'चे आवाहन केले आहे.
"शेतकरी विरोधी कायदे ५ डिसेंबरपूर्वी रद्द करा नाहीतर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातील असा इशारा आम्ही सरकारला दिला होता. पण अजूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाहीय. त्यामुळे आता आम्ही ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा करत आहोत", असं हरविंदरसिंग लखोवाल म्हणाले. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
"केंद्र सरकारला जाचक कृषी कायदे हे मागे घ्यावेच लागतील. आपण आता हे आंदोलन आणखी एक पाऊल पुढे नेत आहोत.", असं ऑल इंडिया किसान सभेचे सचिव हन्नान मोल्ला म्हणाले.
शेतकऱ्यांना हटविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिकाशेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेवर गर्दी होत असून कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता आंदोलकांना हटविण्यात यावं यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.