आता शेतकऱ्यांची चर्चा अमित शहांसोबत, संध्याकाळी बैठकीसाठी बोलविले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 04:25 PM2020-12-08T16:25:04+5:302020-12-08T16:32:12+5:30

farmers protest : शेतकरी नेते आज संध्याकाळी सात वाजता अमित शहा यांची भेट घेतील.

farmer protest amit shah called some farmer leaders for meeting amid bharat bandh | आता शेतकऱ्यांची चर्चा अमित शहांसोबत, संध्याकाळी बैठकीसाठी बोलविले

आता शेतकऱ्यांची चर्चा अमित शहांसोबत, संध्याकाळी बैठकीसाठी बोलविले

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली: 'भारत बंद' आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी सात वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली. ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण अमित शहा यांनी ही बैठक अचानक बोलावली आहे. विशेष म्हणजे, याआधी सरकारने येत्या ९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले असताना ही बैठक बोलाविली आहे.

मंगळवारी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून वाहतूक, दुकाने आणि इतर सेवा ठप्प करण्यात आली. यातच सकाळी अमित शहा यांच्याकडून बैठकीसंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेते आज संध्याकाळी सात वाजता अमित शहा यांची भेट घेतील. ही बैठक अनौपचारिक असेल, असे म्हटले जात आहे. 

या बैठकीसाठी सिंधू, टिकरी आणि गाजीपूर बार्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना बोलविण्यात आले असून एकूण १३ नेते अमित शहा यांची भेट घेतील, असे सांगण्यात येत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, "मला फोन आला, गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही जाऊ आणि अन्य नेते सुद्धा बैठकीला येतील. त्यांनी सात वाजता बोलविले आहे."

गेल्या शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे शेतकरी नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत उपस्थित आहेत. दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या या बैठकीत शेतकरी संघटनांचे ४० प्रतिनिधी सहभागी होते. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या या पाचव्या बैठकीत सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले आहेत.

Read in English

Web Title: farmer protest amit shah called some farmer leaders for meeting amid bharat bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.