नवी दिल्ली - गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "शेतकरी आंदोलनात आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्याबद्दल मोदी सरकारकडून शोक देखील व्यक्त केला जात नाही. मोदी हे देशातील शेतकऱ्यांचे पंतप्रधान नाहीत" असं म्हणत राकेश टिकैत यांनी निशाणा साधला आहे.
"शेतकरी आंदोलनात आतापर्यंत सुमारे 750 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र भारत सरकारकडून त्यांच्या मृत्यूवर शोकही व्यक्त करण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांचे पंतप्रधान नाहीत, असं शेतकऱ्यांना वाटू लागलंय. शेतकरी देशापासून वेगळे आहेत, असा त्यांच्याबद्दल विचार केला जातो" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी आंदोलन सोडून कुठेही जाणार नाहीत. जर एखादे सरकार जर पाच वर्षे चालत असेल, तर जोपर्यंत भारत सरकार एमएसपी सुनिश्चित करणारा कायदा करत नाही आणि शेतीचे तीन कायदे रद्द करत नाही तोपर्यंत लोकांचा पाठिंबा असलेले हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे.
"जेसीबीच्या सहाय्याने प्रशासनाने तंबू हटवले तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील"
काही दिवसांपूर्वी राकेश टिकैत यांनी प्रशासनाला एक इशारा दिला होता. "जेसीबीच्या सहाय्याने प्रशासन येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. जर त्यांनी तसं केलं तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं होतं. दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनात वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर टिकैत यांनी हा इशारा दिला. "जर पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना बळजबरी हटवले तर आम्ही सरकारी कार्यालयांना धान्य बाजार बनवू" असं म्हटलं. दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टीकरी सीमेवरील बॅरीकेड्स हटवणं सुरू केलं आहे.
ज्या ठिकाणी शेतकरी प्रदीर्घ काळापासून आंदोलन करत आहेत. जवळपास वर्षभरापासून हे मार्ग बंदच आहेत. राकेश टिकैत यांनी बॅरिकेडसह त्यांचा तंबू उखाडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं. मात्र दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्यांनी एकाही शेतकऱ्याचा तंबू हटविला गेला नाही असा दावा केला आहे. दिल्लीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात काहीसा तणाव आहे, त्यामुळे दिल्ली पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. शेतकरी आणि पोलीस दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत.