नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीदिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक दिली आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर या शेतकऱ्याला बहादूरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या शेतकऱ्याला हॉर्ट अटॅक आला होता. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा शेतकरी पहिल्या दिवसापासून टिकरी बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झाला होता. तर गेल्या बुधवारीही बहादूरगड बॉर्डवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या आंदोलनादरम्यान गेल्या बारा दिवसांत या आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही शेतकरी आंदोलन करत असून आपल्या मागण्यावंर ठाम आहेत. आपल्या घरांपासून लांब, थंडी असली तरी काळजी न करता शेतकरी दिल्लीच्या बॉर्डवर ठाण मांडून बसले आहेत. दीर्घ संघर्षासाठी तयार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही. यासाठी जर महिने रस्त्यावर घालवायचे असतील तरीही मागे हटणार नाही. रेशनपासून औषधांपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले आहेत. दुसरीकडे, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज चांदणी चौक आणि सदर बाजार परिसरात पेट्रोलिंग केले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत. दिल्लीच्या मोठ्या मार्केटची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये जागोजागी पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.