फारुख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच! पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 03:10 PM2019-07-29T15:10:55+5:302019-07-29T15:29:43+5:30
काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 35 अ आणि कलम 370 बाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
नवी दिल्ली - काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 35 अ आणि कलम 370 बाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीयच आहोत, मात्र कलम 35 अ आणि कलम 370 हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
आज संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, कलम 35 अ, कलम 370 हे हटवता कामा नये. या कलमांवरच आमचा पाया टिकून आहे. त्यांना हटवण्याची गरज नाही. आम्ही भारतीयच आहोत. मात्र कलम 35 अ, कलम 370 हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
Farooq Abdullah, National Conference: Article 35A & Article 370 should not be removed. It forms our foundation. There is no need to remove it. We are Hindustani but they (Article 35A & Article 370) are important for us. pic.twitter.com/rh9CrMTLhx
— ANI (@ANI) July 29, 2019
केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात लष्कराचे दहा हजार जवान तैनात करण्याचा निर्णय घेतल्याने काश्मीर आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकार काश्मीरबाबतच्या कलम 35 अ आणि कलम 370 बाबत मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात केले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डोवाल यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे.