- शीलेश शर्मानवी दिल्ली - संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात कामकाज न झाल्याबद्दल काँग्रेस व भाजपा एकमेकांवर दोष ढकलत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने शुक्रवारी गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणे धरले आणि काँग्रेसला आरोपीच्या पिंजºयात उभे केले.भाजपचे खासदार व मंत्री हातात बॅनर घेऊन उभे होते आणि काँग्रेसने भानावर यावे, लोकशाहीसोबत खेळ करु नका. जनादेशाविरुद्ध काँग्रेसचे षडयंत्र चालणार नाही, अशा घोषणा देत होते. गुुरुवारी विरोधी पक्षांनी याच जागी भाजपा व मोदी सरकारविरोधात धरणे धरले होते. त्याचे हे उत्तर होते.भाजपने १२ एप्रिल रोजी देशव्यापी उपोषणाचे आयोजन केले आहे. संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी ही माहिती देताना सांगितले की, आम्ही देशाला सांगू की, काँग्रेसने संसदेचे कामकाज चालू दिले नाही. काँग्रेसनेही ९ एप्रिल रोजी सर्व जिल्ह्यांत पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. हे उपोषण सद्भावनेसाठी व अलीकडे झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात असेल.मात्र, जिल्हा व प्रदेश कार्यकारिणींना निर्देश देण्यात आले आहेत की, संसदेचे कामकाज चालू न दिल्याबाबत भाजपच्या षडयंत्राविषयीही त्या दिवशी बोलावे. काँग्रेस भाजपाविरुद्ध वातावरण तयार करु इच्छिते.निवडणुकांची तयारीकाही राज्यांतील विधानसभा निवडणुका व पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँगे्रस व भाजपा एकमेकांविरुद्ध आरोप- प्रत्यारोप करत आहेत. भाजपा आपली प्रतिमा सुधारण्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघात १४ एप्रिलपासून रवाना करणार आहे. तिथे ते ५ मे पर्यंत सरकारच्या योजनांबाबत माहिती देतील.
काँग्रेस-भाजपा यांच्यात आता उपोषणयुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:48 AM