लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारकडून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. नुकतेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी अंगणवाडी सेविकांच्या (आशा वर्कर) मानधनात वाढ केली आहे. आता, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित विभागाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी, योगींनी महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत. एखाद्या खासगी शिक्षण संस्थेत दोन बहिणी एकत्र शिक्षण घेत असतील, तर एका बहिणीची फी संस्थेनं माफ करावी. जर, संस्थेने ती फी माफ करण्यास नकार दिला, तर संबंधित विभागाने ती फी भरावी, असे निर्देशच योगींनी दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा स्तरावर एक नोडल ऑफिसर नेमण्याचेही सांगितले आहे.
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात त्यांनी उत्तर प्रदेशच्या 1 लाख 51 हजार विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम पाठवली. तसेच, 30 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृती बँक खात्यात जमा करण्याचीही सूचना केली आहे. याप्रसंगी मुलींच्या शिक्षणावरही योगींनी भाष्य केले.
स्वच्छ भारत मिशनचा परिणाम
देशातील दोन महान योद्ध्यांचा आज जन्मदिवस आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना मी नमन करतो. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या ताकदीने देशाला स्वतंत्र मिळवून दिले. सन 2014 मध्ये 2 ऑक्टोबर रोजीच देशात स्वच्छ भारत मिशन अभियानाची सुरुवात झाली होती. या मोहिमेमुळेच आपण इंसेफेलायटीससारख्या आजारांवर 99 टक्के ताबा मिळवू शकलो. राज्यातील 38 जिल्ह्यांमध्ये या आजारावर 97 टक्के नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार यशस्वी झाल्याचेही योगींनी सांगितले.