धक्कादायक! आठवीतील 56% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 10:14 AM2019-01-16T10:14:52+5:302019-01-16T10:22:23+5:30
देशभरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या जवळपास 56% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसेच 27% मुलांना साधं वाचताही येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
नवी दिल्ली - शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने नवनवीन योजना आखल्या जात असतात. मात्र देशभरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या जवळपास 56% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसेच 27% मुलांना साधं वाचताही येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेच्या सर्व्हेक्षणात ही माहिती उघड झाली आहे. 'प्रथम' च्या रिपोर्टनुसार, इयत्ता आठवीत शिकणारे 56 टक्के विद्यार्थी तीन अंकी संख्येला एका अंकी संख्येने भागू शकले नाहीत. तर, इयत्ता पाचवीच्या 72 टक्के विद्यार्थ्यांना भागाकारच जमत नाही. इयत्ता तिसरीच्या 70 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत नसल्याचं समोर आलं आहे.
दहा वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती याची तुलना केली असता आत्ताची स्थिती अधिक वाईट असल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. 2008 मध्ये इयत्ता पाचवीच्या 37 टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत होतं. आता मात्र ही संख्या 28 टक्क्यांहून कमी झाली आहे. तर 2016 मध्ये ही संख्या 26 टक्क्यांपर्यंत घसरली होती. तसेच अनेक विद्यार्थी व्यवस्थित वाचूही शकत नसल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील प्रत्येक 4 विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी वाचन जमत नसल्याच्या कारणावरून इयत्ता आठवीनंतर शिक्षण सोडून देतो, अशी माहितीही पुढे आली आहे.
गणितामध्ये मुली या मुलांच्या खूपच मागे आहेत. फक्त 44 टक्के मुलींना भागाकार करता येतो, तर भागाकार करता येणाऱ्या मुलांची संख्या 50 टक्के इतकी आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हा आकडा उलटा आहे. या राज्यांमध्ये भागाकार करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेने ही आकडेवारी 28 राज्यांमधील विविध 596 जिल्ह्यांमधून गोळा केली आहे.यामध्ये 3 ते 16 वयोगटातील मुलांचा समावेश होता.