कमी लढा, जास्त जिंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 06:21 AM2019-04-07T06:21:38+5:302019-04-07T06:21:39+5:30
राहुल गांधी यांचा मंत्र : काँग्रेस लढणार लोकसभेच्या ३९६ जागा
- हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २0१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने ४६४ जागा लढवून फक्त ४४ जागा जिंकल्या होत्या. ही काँग्रेसच्या इतिहासातील नीचांकी कामगिरी ठरली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्र, बिहार आणि केरळ या तीनच राज्यात आघाडी तर झारखंडमध्ये समझौता केला होता. यावेळी मात्र काँग्रेस फक्त ३९६ जागा लढवित असून जवळपास सर्व राज्यांत मित्रपक्षांसोबत आघाडी केली आहे. कमी जागा लढवून जास्त जागा जिंकणे, हा मंत्र राहुल गांधी यांनी या निवडणुकीत काँग्रेसला दिला आहे.
दिल्ली आणि शेजारच्या हरियाणात आम आदमी पार्टीसोबत आघाडी झाली असती तर काँग्रेस लढवित असलेल्या जागा आणखी कमी झाल्या असत्या. तथापि, जिंकण्याची शक्यता आणखी वाढली असती. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस सर्व २५ जागा लढवित आहे. त्यातून तेलगू देसम पार्टी (तेदेपा) विरोधातील मतांचे काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात विभाजन होऊन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना लाभ होणार आहे. म्हणजेच या मतांचा भाजपाला थेट लाभ होणार नाही. निवडणुकीनंतर आघाडीचा पर्यायही खुला आहे.
२0१४ मध्ये काँग्रेसने बिहारात १२ जागा लढवून २ जागा जिंकल्या होत्या. यंदा तेथे फक्त ९ जागा लढवून ४ ते ५ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. २0१४ मध्ये काँग्रेसने तामिळनाडूत सर्व ३९ जागा लढविल्या होत्या. तथापि, मिळाली मात्र एकही नव्हती. यंदा द्रमुकशी आघाडी करून काँग्रेस केवळ ८ जागा लढवित आहे. उत्त्तर प्रदेशात काँग्रेसची सपा-बसपाशी आघाडी नसली तरी यावेळी काँग्रेस फक्त ५१ जागा लढवित आहे. त्याचा फायदा सपा-बसपाला होईल. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्त्तीसगढ, पंजाब, उत्त्तराखंड जम्मू-काश्मीर आणि इशान्य भारतात चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.
अनेक राज्यांत मित्रपक्षांना सोडल्या जागा
महाराष्ट्रात काँग्रेसने मजबूत आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना २३ जागा सोडल्या आहेत. कर्नाटक आणि केरळ या राज्यांत काँग्रेसने अधिक लक्ष घातले आहे. या राज्यांत काँग्रेसने अनुक्रमे ९ आणि ८ जागा गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. कर्नाटकात जेडीएससोबत आघडी करून मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले. भाजपाला १८ जागांवरून खाली आणण्यासाठी हा त्याग राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडीला १६ ते १८ जागा मिळविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. वायनाडची जागा लढवून राहुल गांधी केरळात काँग्रेसचा विस्तार करू इच्छित आहेत.