नवी दिल्ली : भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्याला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राहुल गांधी यांनी अरुण जेटलींसह मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला.
विजय माल्ल्याने अनधिकृतपणे अरुण जेटली यांची भेट घेतली होती. विजय माल्या लंडनला पळून जाणार होता, हे अरुण जेटली यांना माहित होते. त्यांनीच विजय माल्याला देशाबाहेर जाण्यास मदत केली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. याचबरोबर, अरुण जेटली आणि विजय माल्या यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये चर्चा करताना काँग्रसेचे नेते पीएल पुनिया यांनी पाहिले होते, असेही राहुल गांधी म्हणाले.
यावेळी पीएल पुनिया म्हणाले, 2016 च्या बजेटवेळचा हा विषय आहे. त्यावेळी विजय माल्ल्या हा संसदेमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी कोपऱ्यात जवळपास अर्धा तास बोलत होता. विजय माल्या भारत सोडून बाहेर जाण्यापूर्वी दोन दिवस ही भेट झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी विजय माल्ल्या भारताबाहेर पळून गेल्याचे वृत्तवाहिन्यांनी दाखविल्याने धक्का बसला.
या घटनेवर मी अडीज वर्ष शांत होतो. विजय माल्ल्या आणि अरुण जेटली यांची भारत सोडण्यावरून चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. तसेच, विजय माल्ल्याने अनधिकृतरित्या अरुण जेटली यांची भेट घेतली होती. या भेटीचे रेकॉर्ड केंद्र सरकारकडे आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असे पीएल पुनिया यांनी सांगितले.