दूरसंचार क्षेत्राला साह्य करण्याचे वित्तमंत्री सीतारामन यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 02:12 AM2019-11-17T02:12:11+5:302019-11-17T02:12:23+5:30
सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतीही कंपनी बंद होऊ नये, अशी माझी इच्छा आहे.
नवी दिल्ली : संकटात असलेल्या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना सरकारकडून मदत करण्यात येऊ शकते, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.
सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतीही कंपनी बंद होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक कंपनी चालली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे अनेक कंपन्या प्रचंड तोट्यात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाढलेल्या देयतेच्या अनुुषंगाने जुलै-सप्टेंबर तिमाहीत रिलायन्स कम्युनिकेशन्सला ३0,१४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. टाटा टेली (महाराष्ट्र) या कंपनीला २,३३५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या तिमाहीतील निकालानंतर सूचीबद्ध दूरसंचार कंपन्यांचा एकत्रित तोटा १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. समायोजित सकळ महसुलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर व्होडाफोन-आयडियासारख्या कंपन्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनी सुरू राहणे हे आता सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे, असे निवेदन व्होडाफोन-आयडियाने अधिकृतरीत्या केले आहे.