मराठी विद्यार्थ्यांना आर्थिक फटका, रहिवासी भागांत क्लासेसना बंदी, दिल्ली महापालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:30 AM2017-11-04T00:30:08+5:302017-11-04T00:30:35+5:30
रहिवासी क्षेत्रात व्यवसाय करणा-या ३२ स्पर्धा परीक्षा क्लासेसना दिल्ली महापालिकेने टाळे ठोकल्याने येथील असंख्य मराठी विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : रहिवासी क्षेत्रात व्यवसाय करणा-या ३२ स्पर्धा परीक्षा क्लासेसना दिल्ली महापालिकेने टाळे ठोकल्याने येथील असंख्य मराठी विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या मराठी विद्यार्थ्यांना या कारवाईमुळे क्लास व घरभाड्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मते ही रक्कम वर्षाला दुप्पट होईल. नव्या जागेत क्लासेस सुरू होईपर्यंत या विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागेल. दिल्लीत दरवर्षी ४ ते ५ हजार मराठी मुले-मुली स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. क्लासेसचे शुल्क, घरभाडे यावर वर्षाला दोन लाख रुपये खर्च होतात. नव्या नियमानुसार व्यावसायिक जागेतच क्लास सुरू करता येईल. त्यासाठी जागेचे भाडे, पाणी, वीज व्यावसायिक दराने घ्यावे लागेल.
३२ क्लासेसना नोटीस
राजेंद्र नगर, पटेल नगर, करोल बाग, जीटीबी नगर भागांतील समुद्र सोल्युशन आयएएस, व्हिजन आयएएस, केडी कॅम्पस, ध्येय आयएएस, केबीसी अकादमी, मानससरोवर लॉ, पायोनिअर अकादमी हे क्लासेस बंद झाले. मुखर्जी नगरमधील ३२ क्लासेसना बंदीची नोटीस पाठवली आहे.