कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोरमध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली. याच वेळी तेथे असलेल्या सिलेंडरचाही स्फोट झाला. ही आग लागली तेव्हा एक व्यक्तीही तेथे अडकली होती. इमारतीच्या संपूर्ण छतावर आणि त्या खालच्या मजल्यावर ही आग पसरली होती. या आगीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीने आजूबाजूला बघितले. मात्र त्याला कुठलाही मार्ग दिसला नाही आणि मग त्याने या इमारतीवरून खाली उडी घेतली.
दोन जणांना गंभीर दुखापत - या घटनेत छतावरून उडी मारणाऱ्या आणि आणखी एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅफेच्या छतावर स्वयंपाक घरात बरेच सिलिंडर होते. ही आग अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागली. महत्वाचे म्हणजे, कॅफेला आग लागली, तेव्हा तेथे कुणीही ग्राहक उपस्थित नव्हते.
बेगलोर शहराच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याची सूचना मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आणि आम्ही तेथील आगीवर नियंत्रम मिळविण्याचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही आठ अग्निशमन दलाची वाहने पाठवली होती. तसेच आमचे वरिष्ठ अधिकारीही तेथे उपस्थित होते. तेथील आग विझवण्यात आली असून दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.