देहरादून - उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सांवणी गावात गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे 40 घरं जळून खाक झाली. आग इतकी भयानक होती गावातील लाकडाची सर्व घरं जळाली. आग लागण्याचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, थंडी वाढली असल्या कारणाने एका घरात शेकोटी पेटवण्यात आली होती, ज्यामुळे त्या घराला आग लागली आणि ती नंतर संपुर्ण गावभर पसरली.
गावात लाकडाची घरं असल्या कारणाने आग अत्यंत वेगाने पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ लहान मुलं, बायका आणि वयस्करांना घेऊन शेताच्या दिशेने धावले. पण गुरंढोरं गावातच राहिली होती. आगीत होरपळून जवळपास 100 जनावरांचा मृत्यू झाला. गाव अत्यंत दुर्गम भागात असल्या कारणाने प्रशासनाला गावात पोहण्याचासाठी खूप वेळ लागला. वेळेत पोहोचू न शकल्याने गावाचं प्रचंड नुकसान झालं.
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जिल्हाधिका-यांना मदत पोहोचवण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी घटनेसंबंधी ट्विट करत लिहिलं आहे की, 'उत्तरकाशीमधील सावणी गावात झालेल्या दुर्घटनेबद्दल मी दुख: व्यक्त करतो. पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर मदत पोहोचवण्याचा आदेश जिल्हाधिका-यांना दिला आहे. पीडित कुटुंबांना औषधं आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा आदेश सीएमओला दिला आहे'.