Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके वाजणार'; विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 02:05 PM2020-09-25T14:05:02+5:302020-09-25T14:12:40+5:30
बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया 29 नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. राज्यात 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून 3 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल.
मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली. त्यानुसार, बिहारमधील विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार असून 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तर, निवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये फटाके वाजणार आहेत.
बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया 29 नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. राज्यात 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून 3 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. निवडणुकांचा अंतिम टप्पा 7 नोव्हेंबर रोजी पडणार असून 3 दिवसांत म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार, हे स्पष्ट होणार आहे. दिवाळीपूर्वीच मतदार आणि उमेदवारांची दिवाळी साजरी होणार आहे. देशात 14 नोव्हेंबर रोजी दिवाळीला सुरूवात होत आहे.
बिहार में पहले चरण के मतदान 28 अक्टूबर को होंगे। दूसरे चरण के मतदान 3 नवंबर को होंगे। तीसरे चरण के मतदान 7 नवंबर को होंगे और मतगणना 10 नवंबर को होगी: सुनील अरोड़ा, मुख्य चुनाव आयुक्त #BiharElectionshttps://t.co/Ej1hY62SWT
— ANI_HindiNews (@AHindinews) September 25, 2020
बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. "कोरोनाचे संकट असल्याने जगातील 70 देशांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. बिहारमधील ही निवडणूक कोरोना काळातील सर्वात मोठी निवडणूक आहे. कोरोना काळातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे" अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली
नामांकन दाखिल करने के लिए उम्मीदवार के साथ दो लोग जा सकते हैं। उम्मीदवार को मिलाकर 5 लोग घर-घर जाकर कैंपेनिंग कर सकते हैं: सुनील अरोड़ा, मुख्य चुनाव आयुक्त #BiharElectionspic.twitter.com/ki8xSlFOMg
— ANI_HindiNews (@AHindinews) September 25, 2020
मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनामुळे नवीन सुरक्षा नियमांनुसार निवडणुका घेण्यात येतील. मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी असेल. एका बूथवर एक हजार मतदार असतील. तसेच यावेळी बिहार निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे असतील. यावेळी मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. बिहार निवडणुकीत मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. मात्र नक्षलग्रस्त भागात असं होणार नाही. तसेच शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करू शकतील"
6 लाख पीपीई किट, 46 लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्स
"कोरोनाच्या संकटात राज्य निवडणूक आयोगाला 6 लाख पीपीई किट देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, निवडणुकीत 46 लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर केला जाणार आहे. पक्ष आणि उमेदवारांना व्हर्च्युअल निवडणूक प्रचार करावा लागणार आहे. कोरोनामुळे मोठ्या जाहीर सभा घेतल्या जाणार नाहीत. तसे उमेदवारीसाठी दोनपेक्षा जास्त वाहने कोणत्याही उमेदवारासह येऊ शकत नाहीत" अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोविड रुग्णही करतील मतदान
कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करतच बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून तीन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. मात्र, कोविड रुग्णांना या निवडणुकीत मतदान करता येईल का? त्यांनी कसं मतदान करायचं? यांसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोविड रुग्णांसाठी मतदानाची वेळ निश्चित केली आहे. कोरोना रुग्णांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था असून मतदान केंद्रावर शेटवच्या क्षणी ते मतदानाचा हक्क बजावतील. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे.