उत्तर प्रदेश सरकारने दिवाळीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने दिवाळीमध्ये फटाके वाजविण्यासाठी दोन तासांची वेळ ठरविली असून रात्री 10 नंतर एकही फटाका फोडण्यावर बंदी आणली आहे. यानंतर फटाके फोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आता रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. याशिवाय परवाना असलेल्या दुकानातूनच फटाके खरेदी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. दिवाऴीमध्ये फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी उत्तर प्रदेश सरकारने केली असून केवळ दोन तासच फटाके फोडण्याचा आनंद लुटता येणार आहे.
न्यायालयाच्या आदेशामध्ये सार्वजनिक जागांवरच फटाके वाजविणे, परवानाधारकांकडूनच फटाके खरेदी आदी निर्देश देण्यात आले आहेत.