नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला मगरमिठी मारली आहे. सर्वच जण कोरोना व्हायरसविरोधातील या लढाईत आपापल्या परीने योगदान देत आहे. अशातच, खुद्द भारताच्या राष्ट्रपतींची पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद यादेखील कोरोना विरोधातील लढाईसाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या स्वतःच गरिबांसाठी मास्क शिवत आहेत आणि कोरोनाचा धैर्याने सामना करण्याचा संदेश देत आहेत.
प्रथम महिला सविता कोविंद यांनी बुधवारी कोरोनाविरोधातील लढाईत आपले योगदान दिले. प्रेसिडेंट इस्टेट येथील शक्ती हाट येथे त्यांनी स्वतःच्या हाताने मास्क शिवले. त्याच्या या योगदानातून, वैश्विक आणि राष्ट्रीय संकटांचा सामना एकत्र येऊनच केला जाऊ शकतो, हा संदेशही लोकांपर्यंत जातो. येथे शिवण्यात येणारे मास्क दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाच्या विविध शेल्टर होम्सना वितरित केले जात आहेत.
अशी आहे देशाची स्थितीगेल्या 24 तासांत देशामध्ये कोरोनाचे 1486 नवे रुग्ण आढळले असून, याच काळात 49 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 21 हजार 370 झाली असून, त्यापैकी 4370 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी इतर देशांच्या तुलनेत आपण कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू दिली नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
संपूर्ण जग करत आहे कोरोनाचा सामना -जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा 1 लाख 84 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 7 लाख 17 हजार 635 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून जगात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाचा युद्धस्तरावर सामना करत आहेत.