नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नी येत्या शुक्रवारी पुढच्या फेरीची चर्चा होणार आहे. डोकलाममध्ये दोन्ही देशांमध्ये चाललेल्या 73 दिवसांच्या संघर्षानंतर पहिल्यांदा ही बैठक होत आहे. डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकले होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिलेल्या निमंत्रणावरुन येत्या 22 डिसेंबरला चीनचे सीमा विषयावरील विशेष प्रतिनिधी यांग जीईची सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भारतात येणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. भारत आणि चीनच्या प्रतिनिधींमध्ये होत असलेल्या या बैठकीचे महत्व फक्त सीमा विषयापुरती मर्यादीत नसून, रणनितीक संवाद साधण्याचेही एक माध्यम आहे असे बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ च्युनयिंग यांनी सांगितले.
2017 सालात दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध होते पण डोकलामचा वाद दोन्ही देशांसाठी परिक्षेचा काळ होता. भविष्यात अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी आपण अशा घटनांमधून धडा घेतला पाहिजे असे हुआ म्हणाले. 28 ऑगस्ट रोजी डोकलामवरुन निर्माण झालेला वाद संपुष्टात आला होता. दरम्यान, डोकलामवरून भारत व चीन यांच्यातील वाद शमल्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आजही डोकलामध्ये चीनचे १८00 सैनिक तैनात आहेत. त्यामुळे कडाक्याच्या थंडी व बर्फवृष्टीत भारताला प्रथमच तिथे आपले सैन्य ठेवण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे, तर भारताने त्या भागातून आपले सैन्य कमी केल्यानंतर चीनने तिथे नवे रस्तेही बांधले आहेत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
चीनने गेल्या दोन महिन्यांत डोकलाममध्ये नवे रस्ते बांधले असल्याचे सॅटेलाइट चित्रांवरूनच उघड झाले आहे. भारताच्या बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन(बीआरओ) प्रमाणे चीनची चीन रोड वर्कर्स नावाची जी संस्था आहे, तिने त्या भागांत काही रस्ते नव्याने बांधले आहेत, तर काही रस्त्यांचा विस्तार केला आहे. ज्या भागांत अडीच महिन्यांपूर्वी भारत व चीनी सैनिक जिथे एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र होते, तेथून जवळच हे रस्ते आहेत. त्यातील दोन रस्त्यांचे काम आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यात सुरू करण्यात आले होते. ते आता पूर्ण झाले आहे.
चीन व भारत या दोघांनी डोकलाममधून आपले सैन्य कमी करावे, असे दोन देशांत ठरल्याचे सांगण्यात आले होते. भारताने सैन्य माघारी घेतल्याबद्दल चीनने समाधान व्यक्त केले होते, तर चीनचे सैन्य कमी केल्यानंतर हा भारताचा विजय असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते.