बुडत असलेल्या अंशिकाला वाचवताना एकाच कुटुंबातील पाच मुलं बुडाली, समोर आला दुर्घटनेआधीचा शेवटचा ग्रुप फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 10:50 AM2022-10-05T10:50:34+5:302022-10-05T10:50:55+5:30
Six Kids drowning In Ganga:उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये मंगळवारी गंगाघाटावर फोटो काढताना सहा मुले बुडाली होती. त्यातील एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे
लखनौ - उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये मंगळवारी गंगाघाटावर फोटो काढताना सहा मुले बुडाली होती. त्यातील एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. बिल्हौर येथील गंगा घाटावर झालेल्या या दुर्घटनेतील उर्वरित मुलांचा शोध घेण्यासाठी आज सकाळपासूनच जिल्हा प्रशान, एसडीआरएफ आणि पाणबुड्यांच्या पथकांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. मात्र त्यात अद्यापही यश आलेलं नाही.
या दरम्यान, या सहा मुलांचा शेवटचा ग्रुप फोटो समोर आला आहे. दुर्घटना होण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांनी हा फोटो काढल्याचे सांगण्यात येत आहे. या सहा मुलांपैकी एक मुलगी पाण्यात बुडत होती. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एकापाठोपाठ एक अशी ही पाच मुलेही बुडाली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा एका मुलाचा मृतदेह सापडला होता. तर पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सौरव कटियारच्या काकांच्या दुकानाचं उद्घाटन होतं. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व नातेवाईक आणि त्यांची मुलं आली होती. त्यामध्ये अनुष्का, तनू, मनू, अंशिका, अभय आणि सौरभ यांचा समावेश होता. सर्वजण मंगळवारी गंगेत उभे राहून फोटो काढत होते. तर गौरी बाहेर उभी राहून फोटो काढत होती.
त्याचदरम्यान, अंशिका बुडू लागली, तिला वाचवताना सर्वांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र हे सर्वजण बुडाले. ही मुलं एकमेकांची नातेवाईक होती. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. संध्याकाळी एसडीआरएफची टीम घटनास्थळी आली. तत्पूर्वी केवळ सौरभचाच मृतदेह हाती लागला होता.