पाच हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट शक्यप्राय, नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 04:38 AM2020-01-20T04:38:42+5:302020-01-20T04:40:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट कठीण असले तरी अशक्य नाही. देशात मुबलक संसाधने आहेत, तसेच देशाची उत्पादन क्षमताही चांगली आहे
इंदूर (मध्यप्रदेश) : पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट कठीण असले तरी शक्यप्राय आहे. आयातीवर जास्त विसंबून न राहता देशांतर्गत उत्पादन वाढवून हे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
इंदूर मॅनेजमेन्ट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन परिसंवादात ते बोलत होते. कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भक्कम राजकीय इच्छाशक्ती अत्यंत महत्त्वाची असते. याच इच्छाशक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट कठीण असले तरी अशक्य नाही. देशात मुबलक संसाधने आहेत, तसेच देशाची उत्पादन क्षमताही चांगली आहे. असे असूनही दरवर्षी औषधी, वैद्यकीय उपकरणे, कोळसा, तांबे, कागद आदी वस्तूंच्या आयातीवर आपण कोट्यवधी रुपये खर्च करतो.
२०२४-२५ पर्यंत ५ हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी आयात करण्याऐवजी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागेल. विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची भागीदारी वाढविण्यावर भर देत निर्यातीला चालना दिली जाईल. या क्षेत्रात पाच कोटी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत मिळेल. पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी काय योगदान देता येईल, असे सरकार आपल्या प्रत्येक विभागाला विचारत आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
अन्य कारणांमुळे आव्हाने निर्माण होतात
अर्थव्यवस्थेतील सुस्तीबाबत ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वांत गतिमान आहे; परंतु व्यवसायाचे एक चक्र असते. कधी जागतिक अर्थव्यवस्थेच्या कारणांमुळे, तर कधी मागणी आणि पुरवठ्यात तफावत राहणे, तसेच अन्य कारणांमुळे आव्हाने निर्माण होतात.
समस्या आणि आव्हानांचे संधीत रूपांतर करू शकणाऱ्या युवापिढीतील नेतृत्वात मी देशाचे भवितव्य बघतो. देशात भांडवल, संसाधने आणि तंत्रज्ञानाची कमतरता नाही; परंतु विविध क्षेत्रांत योग्य दृष्टिकोन आणि नेतृत्वाची वानवा जरूर आहे.