ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 26 - सोशल मीडियावरची आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टचे सीईओ संजय बावेजा यांनी राजीनामा दिला आहे. भारतात ई-कॉमर्समध्ये फ्लिपकार्ट ही कंपनी सर्वात अग्रगण्य कंपनी समजली जाते. फ्लिपकार्टनं दिवाळीच्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स उपलब्ध करून दिल्या असतानाच सीईओ संजय बावेजा यांचा राजीनामा हा फ्लिपकार्टसाठी मोठा धक्का समजला जातो आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या सीएफओची भूमिका बजावलेले बावेजा दोन वर्षांपूर्वीच फ्लिपकार्टमध्ये आले होते. जुलै महिन्यात कंपनीचे कायदेशीर हेड रजिंदर शर्मा यांनीदेखील 10 महिन्यांमध्ये राजीनामा सादर केल्यानं तो चर्चेचा विषय झाला होता. आता बावेजा यांनी राजीनामा दिला आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी उत्तराधिकाऱ्याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. फ्लिपकार्टचे हेड ऑफ कॅटेगरी मॅनेजमेंट कल्याण कृष्णमूर्ती हे सीएफओची भूमिका तात्पुरती पार पाडू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जाते आहे. याआधीही त्यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फ्लिपकार्टच्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कंपनीचा आर्थिक पातळीवरील संघर्ष सुरू असतानाच दिवाळी सवलत योजनांनंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. फ्लिपकार्टनं काही दिवसांपूर्वी कॉस्ट-कटिंगअंतर्गत 1,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. फ्लिपकार्ट आता नव्या फेरीत निधी उभारण्याची तयारीला लागली आहे. या फेरीत अमेरिकी रिटेल कंपनी वॉलमार्टचा सक्रिय सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
फ्लिपकार्टचे सीईओ संजय बावेजा यांचा राजीनामा
By admin | Published: October 26, 2016 5:10 PM