प्रेरणादायी! फूड डिलिव्हरी बॉय झाला सॉफ्टवेअर इंजिनीअर; तुफान व्हायरल होतेय सक्सेस स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 10:26 PM2022-05-28T22:26:43+5:302022-05-28T22:33:59+5:30
Zomato, Swiggy वरून करणारा फूड डिलिव्हरी बॉय आता एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनीअर झाला आहे.
नवी दिल्ली - एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची सक्सेस स्टोरी सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एकेकाळी Zomato, Swiggy वरून करणारा फूड डिलिव्हरी बॉय आता एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनीअर झाला आहे. शेख अब्दुल सत्तार असं या तरुणाचं नाव असून त्याने त्याचा संघर्ष लिंक्डइनवर शेअर केला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये शेखने सांगितले की, पूर्वी तो ओला, स्विगी, उबेर, रॅपिडो आणि झोमॅटोमध्ये काम करून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असे.
"मी एक डिलिव्हरी बॉय आहे, माझे एक स्वप्न आहे. मी Ola, Swiggy, Uber, Rapido, Zomato सोबत काम केलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षापासून मी या ठिकाणी काम करत आहे. माझे वडील कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी असल्याने आमच्याकडे जगण्याइतकेच पैसे होते. त्यामुळे जास्तीत जास्त काम करून कुटुंबाला मदत करायची होती. मी सुरुवातीला भित्रा होतो, पण डिलिव्हरी बॉय असल्याने मला खूप काही शिकायला मिळाले" असं म्हटलं आहे.
"नोकरीतून पैसे मिळवून पूर्ण केलं स्वप्न"
आपली सक्सेस स्टोरी शेअर करताना शेख अब्दुल सत्तार याने सांगितलं की, त्याच्या एका मित्राने त्याला कोडींग कोर्समध्ये जॉईन करण्याचा आग्रह धरला. यामुळे त्याला सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्यास मदत झाली. कोडिंग शिकण्यासाठी त्याने संध्याकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत डिलिव्हरीचे काम केले. मी माझ्या नोकरीतून जे पैसे कमावले, ते मी पॉकेटमनी म्हणून आणि माझ्या कुटुंबाच्या छोट्या गरजांसाठी वापरत असे. लवकरच मी स्वतः वेब एप्लिकेशन्स तयार करायला सुरुवात केली. मी काही प्रोजेक्ट पूर्ण केले आणि नोकरीसाठी कंपन्यांकडे अर्ज करण्यास सुरुवात केली.
शेख अब्दुल सत्तार म्हणाला की, डिलिव्हरी एजंट म्हणून काम केल्याचा मला अभिमान आहे कारण त्यांच्या कर्तव्याने त्याला खूप काही शिकवलं. "माझ्या डिलिव्हरी बॉयच्या अनुभवामुळे मला लोकांशी संवाद साधण्यास मदत झाली. आज नोकरी संपल्यावर काही महिन्यांच्या पगारातून आई-वडिलांचे ऋण मी फेडू शकेन अशी परिस्थिती माझ्यासमोर आली आहे" असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.