गुवाहाटी : वरिष्ठ काँग्रेसचे नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी हिंदूंचे जिना असल्याचे तरुण गोगोई यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी सुद्धा भारताला धर्माच्या आधारे विभाजन करणाऱ्या मोहम्मद अली जिनांच्या 'टू नेशन थिअरी'ला फॉलो करत आहेत, असा आरोप तरुण गोगोई यांनी केला आहे. तरुण गोगोई म्हणाले, "आम्ही (काँग्रेस) पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान आमच्यावर करतात. मात्र, त्यांनी स्वतःला जवळच्या देशाच्या पातळीपर्यंत खाली आणले आहे. ते जिना यांच्या दोन राष्ट्र या सिद्धांताकडे जात आहेत आणि भारताचे हिंदू जिना या रूपाने उदयास आले आहेत."
याचबरोबर, तरुण गोगोई यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे, त्यावरुन लोकांनी भाजपा आणि त्यांच्या संघटनांची हिंदुत्त्व विचारसरणी नाकारली असल्याचे सिद्ध होत आहे असे सांगत भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले, "आम्ही हिंदू आहोत. मात्र देशाला हिंदू राष्ट्र होताना पाहू शकत नाही. विरोध करणाऱ्यांमध्ये जास्तकरून हिंदू आहेत. जे भाजपा आणि आरएसएसच्या हिंदुत्वाला नाकारत आहेत."
याशिवाय, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी (दि.5) विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचाही तरुण गोगोई यांनी तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, तरुण गोगोई तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन तरुण गोगोई हे सतत केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात एकही डिटेंशन सेंटर नसल्याच्या दावा केला होता. त्यावरून तरुण गोगोई यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते. नरेंद्र मोदी खोटं बोलत असून भाजपा सरकारने आसाममध्ये डिटेंशन सेंटर उभारण्यासाठी 2018 मध्ये 46 कोटींचा निधी जारी करण्याचे तरुण गोगोई यांनी म्हटले होते.
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.