रांची : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणाशी संबंधित चाईबासा ट्रेजरी प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, जामीन मंजूर झाला असला तरी ते तुरूंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत. दरम्यान, सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यात दोषी ठरवले आहे. त्यामुळे ते सध्या तुरूंगात आहेत.
झारखंड हायकोर्टाने शुक्रवारी लालू प्रसाद यादव यांना चाईबासा ट्रेजरी प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. तसेच, ५० हजारांच्या दोन जातमुचलक्यांवर आणि २ लाख रुपये दंड असे या जामिनाचे स्वरुप आहे, असेही झारखंड हायकोर्टाने सांगितले आहे. मात्र दुमका ट्रेझरी प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरु असल्याने तूर्तास लालू प्रसाद यादव यांना तुरुंगाबाहेर येता येणार नाही.
सुमारे ९५० कोटी रुपयांच्या चारा घोटाळा प्रकरणासह तीन वेगवेगळ्या केसमध्ये लालू प्रसाद यादव हे आरोपी आहेत. सप्टेंबर २०१३ मध्ये चारा घोटाळा प्रकरणी दोषी आढळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना अटक झाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये ते जामिनावर बाहेर आले. मात्र, त्यानंतर पुन्हा २३ डिसेंबर २०१७ मध्ये लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर त्यांना बिरसा मुंडा तुरुंगात पाठविण्यात आले. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मात्र, सध्या न्यायालयीन कोठडी अंतर्गत त्यांच्यावर झारखंडच्या राजेन्द्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) मध्ये उपचार सुरु आहेत.