सेहवाग राजकारणाच्या मैदानात? भाजपाच्या तिकिटावर हरयाणातून लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 11:41 AM2019-02-07T11:41:05+5:302019-02-07T11:42:15+5:30

रोहतक लोकसभा मतदारसंघातून नवी इनिंग सुरू करणार असल्याची चर्चा

Former Indian Cricketer Virender Sehwag likely to Contest in 2019 Lok Sabha Polls From Haryana Rohtak Seat As Bjp Candidate | सेहवाग राजकारणाच्या मैदानात? भाजपाच्या तिकिटावर हरयाणातून लढण्याची शक्यता

सेहवाग राजकारणाच्या मैदानात? भाजपाच्या तिकिटावर हरयाणातून लढण्याची शक्यता

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सेहवाग भाजपाकडून राजकीय इनिंग सुरू करू शकतो. रोहतक मतदारसंघातून सेहवागला राजकीय आखाड्यात उतरवण्याचा भाजपाचा विचार आहे. रविवारी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यावेळी सेहवागच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. 

रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचं वर्चस्व आहे. त्यामुळेच या मतदारसंघातून सेहवागला राजकीय मैदानात उतरवलं जाऊ शकतं. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी अद्याप असा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं. सेहवाग अद्याप पक्षात सहभागीदेखील झालेले नाहीत, असं ते म्हणाले. तर दुसरीकडे भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं लोकसभेच्या तिकीटाची ऑफर सेहवागला देण्याची जबाबदारी घेतली आहे. ही व्यक्ती दिल्ली आणि एनसीआरमधील राजकारणात अतिशय सक्रीय असल्याचं बोललं जातं. 

वीरेंद्र सेहवागबद्दल पक्षानं निर्णय घेतल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. आता याबद्दल सेहवाग नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. सेहवाग सोबतच सूफी गायक हंसराज हंसचं नावदेखील लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे. हंसराज हंस काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये दाखल झाले आहेत. त्यांना सिरसा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. 2014 मध्ये भाजपाला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. मतदारसंघात जाऊन कामाला लागा, अशा सूचना वरिष्ठांकडून हंस यांना देण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Former Indian Cricketer Virender Sehwag likely to Contest in 2019 Lok Sabha Polls From Haryana Rohtak Seat As Bjp Candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.