नवी दिल्ली - माजी न्यायमूर्ती आणि राज्यसभेसाठी उमेदवारी मिळवणारे रंजन गोगोई यांनी न्यायव्यवस्था आणि प्रामाणिकपणाशी तडजोड केल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला. प्रमाणिकपणाशी तडजोड केल्याबद्दल गोगोई यापुढे लक्षात राहितील, अशी टीका सिब्बल यांनी केली. त्यांनी ट्विट करून गोगोई यांच्यावर निशाना साधला.
सिब्बल यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माजी न्यायमूर्ती एच.आर. खन्ना हे प्रमाणिकपणा, सरकारसमोर उभं राहणे आणि कायद्याचे राज्य कायम ठेवण्यासाठी परिचीत आहेत. मात्र न्यायमूर्ती गोगोई राज्यसभेसाठी सरकारसोबत उभं राहणे आणि प्रमाणिकपणाशी तडजोड करण्यासाठी लक्षात ठेवले जातील.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी रंजन गोगोई यांचे नाव राज्यसभेसाठी घोषित केले आहे. गोगोई 17 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते. निवृत्ती होण्यापूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या खंडपीठाने आयोध्यासह इतर प्रकरणावर निर्णय दिला होता. गोगोई आता पुढील काळात राज्यसभेत दिसणार आहेत.