Agnipath Scheme: "अग्निपथ योजना लष्करावर ताबा मिळवण्यासाठी RSS चा छुपा अजेंडा;" मोदी सरकारवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:27 PM2022-06-20T17:27:37+5:302022-06-20T17:28:38+5:30
आता ज्या 10 लाख लोकांची भरती केली जाणार आहे, ते आरएसएसचे कार्यकर्त्येही असू शकतात.
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेला देशातील अनेक भागांत विरोध होत आहे. यातच, अग्निपथ योजना ही लष्करावर ताबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचा छुपा अजेंडा आहे, असा गंभीर आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. एवढेच नाही, तर आरएसएसचे कार्यकर्तेच सैन्यदलात अग्निवीर होतील आणि ते बाहेरही हेच काम करतील. त्यांची सेवा संपल्यानंतर, ते आरएसएससाठीच काम करतील, असा दावाही कुमारस्वामी यांनी केला आहे.
यावेळी, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते त्यांची नियुक्ती करणार, की लष्कर? असा सवाल उपस्थित करत कुमारस्वामी म्हणाले, आता ज्या 10 लाख लोकांची भरती केली जाणार आहे, ते आरएसएसचे कार्यकर्त्येही असू शकतात. ते अडीच लाख कार्यकर्त्यांना लष्करातही भरती करू शकतात. तसेच चार वर्षांनंतर, जे 75 टक्के तरुण बाहेर पडतील, त्यांनाही 11 लाख रुपये दिले जातील. ते संपूर्ण देशभरात पसरतील, हा एक छुपा अजेंडा आहे,” असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे.
कुमारस्वामी म्हणाले, 'आरएसएस लष्करावर ताबा मिळविण्याचा विचार करत आहे.' जेव्हा जर्मनीमध्ये हिटलरची राजवट होती, त्याच काळात आरएसएसची स्थापना झाली. यामुळे, आता आरएसएसला देशात नाझी राजवट लागू करण्याचीही इच्छा असू शकते. यासाठीच त्यांनी अग्निपथ योजना सुरू केली आहे.
कुमारस्वामी यांचे वक्तव्य म्हणजे लष्कराचा अपमान -
एचडी कुमारस्वानी यांच्या आरोपांवर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. अशी विधाने करणे, हे अत्यंत लज्जास्पद आहे. आता आरएसएस आणि भाजपला सोडून थेट भारतीय सेन्य दलाला टार्गेट केले जात आहे. या देशाचे लष्कर, अशा प्रकारची तडजोड होऊ देईल? हा बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्यांचा अपमान आहे. कुमारस्वामी यांचे वक्तव्य म्हणजे थेट लष्कराचा अपमान आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हणाले आहे.