नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यावर दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. मंगळवारी रुग्णालयाकडून जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये सांगितलं आहे की, प्रणब मुखर्जी यांची तब्येत नाजूक आहे. त्यांना अद्यापही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. ब्रेन सर्जरीनंतर मुखर्जी यांच्या तब्येतीत कोणतीची सुधारणा नाही.
हॉस्पिटलच्या सूत्रांनुसार प्रणब मुखर्जी यांची तब्येत ढासळली आहे. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं आहे. अद्यापही त्यांची तब्येत नाजूक आहे. त्यांच्या तब्येतीवर डॉक्टर नजर ठेऊन आहेत. मेडिकल बुलेटीनच्या माहितीनुसार १० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजून ०७ मिनिटांनी प्रणब मुखर्जी यांना दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तपासणीत लक्षात आले की, त्यांच्या डोक्यामध्ये रक्ताच्या गाठी जमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं सर्जरी करण्यात आली.
या सर्जरीनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. मेडिकल तपासणीत प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. सोमवारी प्रणब मुखर्जी यांनीच कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची शिफारस डॉक्टरांनी केली. रिपोर्टनुसार त्यांच्यावर ब्रेन सर्जरीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पण अद्याप ते व्हेंटिलेटरवर आहेत.
प्रणब मुखर्जी यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी अनेक नेत्यांनी प्रार्थना केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा समावेश आहे.