बंगळुरू/नवी दिल्ली : कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे १३ मंत्री व काँग्रेसचे २0 मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित झाले आहे. शपथविधीनंतर आपण २४ तासांतच बहुमत सिद्ध करू, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी १५ दिवसांचा अवधी दिला असला तरी ते तोपर्यंत थांबणार नाहीत, असा त्याचा अर्थ आहे.फॉर्म्युला नक्की झाला असला तरी कुमारस्वामी उद्या, सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तसेच यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी राहुल गांधी यांच्याशी त्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. कुमारस्वामी हेही उद्या स्व. राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट देतील व त्यांना आदरांजली अर्पण करतील, असे सांगण्यात येते. कर्नाटकातील काँग्रेसचे नेतेही उद्याच दिल्लीत पोहोचत आहेत. हा फॉर्म्युला गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून ठरेल आणि त्याला अंतिम स्वरूप राहुल गांधी देतील, असे समजते.कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणे नक्की आहे. तसेच काँग्रेस फोडण्याची येडियुरप्पांची खेळी उधळून लावणारे डी. के. शिवकुमार यांचेही मंत्रिमंडळातील स्थान नक्की आहे. कुमारस्वामींच्या पक्षाकडे वित्त खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते राहील, असे सध्याचे चित्र आहे. हीच दोन अतिशय महत्त्वाची खाती मानली जातात. काँग्रेसकडून अधिकाधिक लिंगायत आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा अंदाज असून, येडियुरप्पा यांचे भविष्यातील डाव यशस्वी होऊ नयेत, यासाठीच हे केले जाईल.बसपा, एक अपक्ष व एक मुस्लीम आमदारही सरकारमध्ये असेल.कुमारस्वामींनी बहुमत सिद्ध केले तरी भाजपा सरकार पाडण्याचा व आमदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करेल, असे दोन्ही पक्षांना वाटत आहे. त्यामुळे अधिकाधिक आमदारांना खूष ठेवणे, हे कुमारस्वामी यांच्यापुढील आव्हान असेल. त्यासाठी विविध महामंडळांवर आमदारांच्या लवकर नियुक्त्या करणे आणि त्यासाठी दोन्ही पक्षांत मतैक्य घडवून आणणे गरजेचे आहे, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.सरकार चालवणे, ही आमची जबाबदारीकाँग्रेसच काही काळाने हे सरकार पाडेल, असे भाजपा नेते सांगत आहेत. पण सरकारने आपला काळ पूर्ण करावा, असे आमचे प्रयत्न राहतील, असे सांगून काँग्रेस नेता म्हणाला की, सध्या भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. यामुळे सरकार पाडण्याचे प्रयत्न वा सरकार पडेल, अशी कृती काँग्रेसकडून होणार नाही.अडीच वर्षांचा फॉर्म्युला नाहीच : कुमारस्वामीमुख्यमंत्रीपद अडीच वर्षे कुमारस्वामी यांच्याकडे राहील आणि नंतर ते काँग्रेसकडे जाईल, अशा बातम्या शनिवारपासून पसरल्या होत्या. पण तसे घडणार नाही आणि आपणच पूर्ण काळ मुख्यमंत्री राहू, असे कुमारस्वामी यांनी व काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.विरोधी ऐक्याचे प्रदर्शनआंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, पंजाब, पुडुच्चेरी, सिक्किम येथील मुख्यमंत्र्यांना शपथविधीचे निमंत्रण त्यासाठीच दिले आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, फारुख अब्दुल्ला, मायावती, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ओमर अब्दुल्ला, तसेच दोन्ही डावे पक्ष आणि भाजपाविरोधात असलेले सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते यांना शपथविधीसाठी निमंत्रित केले जाणार आहे. आम्ही भाजपाविरोधात एकत्र आलो आहोत, असे चित्र त्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
कर्नाटक सत्तावाटपाचा २४ तासांत फॉर्म्युला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:26 AM