रांची:छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षल प्रभावित सुकमा(Sukma) जिल्ह्यातील नऊ महिला नक्षलवाद्यांसह 43 नक्षलवाद्यांनी बुधवारी सुरक्षा दलांसमोर शरणागती पत्करली(Naxalities Surrender). सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणाले की, जिल्ह्यात सुरू असलेल्या 'पूना नर्कोम'(नवी सकाळ) अभियानांतर्गत या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.
एसपी सुनील शर्मा पुढे म्हणाले, पूना नर्कोमा मोहिमेमुळे प्रभावित होऊन आणि स्थानिक आदिवासींवरील शोषण, अत्याचार, भेदभाव आणि हिंसाचाराला कंटाळून 43 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मिलिशिया कमांडर पोडियामी लक्ष्मणदेखील आहे. याच्यावर सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
18 नक्षलवादी कुकनार आणि 19 गदिरास पोलीस स्टेशन हद्दीतील
सुनील शर्मा पुढे म्हणाले की, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी काही नक्षलवादी मिलिशिया सदस्य, दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना, क्रांतिकारी महिला आदिवासी संघटना आणि चेतना नाट्य मंडळीचे सदस्य आहेत. शरण आलेल्या नक्षलवाद्यांपैकी 18 हे कुकनार पोलीस स्टेशन आणि 19 गदिरास पोलीस स्टेशन हद्दीतील आहेत.
याशिवाय, चार तोंगपाल पोलीस स्टेशन, एक फुलबागडी पोलीस स्टेशन आणि एक चिंतागुफा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. जिल्ह्यात सुरक्षा दल आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने नक्षल निर्मूलन मोहीम राबवली जात आहे. ज्या अंतर्गत पोलीस दल सुकमाच्या अंतर्गत मोहिमेपर्यंत पोहचून जिल्हा प्रशासनाच्या पुनर्वसन धोरणाला प्रोत्साहन देत आहे. जेणेकरून नक्षलवादी हिंसेचा मार्ग सोडू शकतील. याचाच भाग म्हणून या नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कारली आहे.
पुनर्वसन धोरणांतर्गत मदत दिली जाईल
शर्मा म्हणाले की, या नक्षलवाद्यांना राज्याच्या पुनर्वसन धोरणांतर्गत मदत आणि इतर सुविधा पुरवल्या जातील. जिल्ह्यात 'पूना नर्कोम' अभियान सुरू झाल्यापासून सुमारे 30 गावांतील 176 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसोबत एसपींनी जेवणही केलं, यावेळी सीआरपीएफचे अधिकारीही उपस्थित होते. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पूना नर्कोम मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत.