चार ख्रिश्चन धर्मगुरूंवर बलात्काराचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:38 PM2018-07-02T23:38:28+5:302018-07-02T23:38:56+5:30
मलानकारा आॅर्थोडोक्स सिरीयन चर्चच्या चार धर्मगुरुंविरुद्ध केरळ पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा सोमवारी दाखल केला. या चर्चच्या पाच धर्मगुरुंवर महिलेचे लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता.
तिरूवनंतपूरम : मलानकारा आॅर्थोडोक्स सिरीयन चर्चच्या चार धर्मगुरुंविरुद्ध केरळ पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा सोमवारी दाखल केला. या चर्चच्या पाच धर्मगुरुंवर महिलेचे लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता.
पीडितेने गुन्हा शाखेच्या पोलिसांकडे येऊन आपले म्हणणे नोंदवल्यावर गुन्ह्याची नोंद केली गेली. या निवेदनात पीडितेने तिच्यावर बलात्कार झाल्याचे व ब्लॅकमेल केले गेल्याला दुजोरा दिला. माझ्या पत्नीवर चर्चच्या धर्मगुरुंनी बलात्कार केला असा आरोप करणारे पीडितेच्या पतीच्या चर्च अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणाची आॅडिओ क्लीप गेल्या आठवड्यात समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पथानामथित्ता जिल्ह्यातील या व्यक्तीने काही धर्मगुरू हे त्याच्या पत्नीच्या गुप्त कबुलीजबाबाच्या (कन्फेशन) आधारे तिला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप केला होता. तथापि, या प्रकरणी कोणतीही तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली नव्हती.
राष्ट्रीय महिला आयोगानेदेखील पोलिस महासंचालक आणि राज्याच्या पोलिस प्रमुखांना या प्रकरणी तपास करून काय कारवाई केली याचा तपशील द्यावा, असे म्हटले होते. कोट्टायम येथील या चर्चने झालेल्या आरोपांच्या स्पष्ट आणि नि:पक्ष चौकशीचे आदेश आम्ही दिले असून दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते.
आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही व निर्दोषीला शिक्षा केली जाणार नाही, असे चर्चचे निवेदनात म्हटले होते. ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल. कथित घटनेवरून अनुयायांच्या व सर्व सामान्यांच्या भावना आम्हाला समजतात. मात्र ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो, असेही चर्चने निवेदनात म्हटले. (वृत्तसंस्था)