जम्मू-काश्मीरमध्ये जैशच्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 06:45 AM2020-11-20T06:45:18+5:302020-11-20T06:45:38+5:30

मोठा शस्त्रसाठा जप्त; घातपाती कारवायांचा कट उधळला  

Four Jaish militants strangled in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये जैशच्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये जैशच्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान

googlenewsNext

जम्मू : जम्मूनजिक राष्ट्रीय महामार्गावर नागरोटा येथे गुरुवारी पहाटे पाच वाजता सुरक्षा दलाने तपासणीसाठी एक ट्रक अडविल्यानंतर त्यात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत ट्रकमधील जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी ठार व दोन पोलीस जखमी झाले 
आहेत. या दहशतवाद्यांकडून  ११ एके रायफली, ३ पिस्तुले, २९ हातबॉम्ब, ६ यूबीजीएल ग्रेनेड असा मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलाने जप्त केला आहे.
काश्मीरमध्ये २८ नोव्हेंबरपासून होणाऱ्या डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल (डीडीसी)च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले. 


काश्मीरमधील राजकीय प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असून त्या देशाच्याच इशाऱ्यानुसार जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी जम्मूहून काश्मीर खोऱ्याकडे निघाले होते. या संघटनेत काही महिन्यांपूर्वीच या दहशतवाद्यांचा प्रवेश झाला होता व त्यांनी घातपाती कारवायांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. (वृत्तसंस्था)

तब्बल साडेतीन तास चालली चकमक
जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले की, सीआरपीएफ व जम्मू-काश्मीर पोलिसांनी अडविलेल्या ट्रकची तपासणी सुरू करताच आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. 
तब्बल साडेतीन तास ही चकमक चालू हाेती. दहशतवादी आत्मसमर्पन करायला तयार नव्हते. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर ग्रेनेडही फेकले. यात दाेन जखमी झाले आहेत. या ट्रकचा चालक बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले?
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत गोळीबार करून त्याच्या आडून दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात घुसविण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारतीय लष्कराने गुरुवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. 
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकव्याप्त काश्मिरातील अनेक दहशतवादी प्रशिक्षण छावण्या उद्ध्वस्त झाल्या. पाकव्याप्त काश्मिरातील कोणत्या भागात ही कारवाई करण्यात आली, हे मात्र समजू शकलेले नाही. अतिरेक्यांच्या घुसखोरीला अटकाव करण्यासाठी भारतीय लष्कराने कारवाई  केल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले.
मात्र भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने हे वृत्त खरे नाही आणि भारताने अशी कोणतीही कारवाई केलेली नाही, असे स्पष्ट केले.

हाफीझ सईदला दहा वर्षांची शिक्षा 
जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार 
हाफीझ सईद याला दोन प्रकरणांत दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. -वृत्त/ वर्ल्ड वाइड

Web Title: Four Jaish militants strangled in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.