चिक्कमंगळुरु - मोबाइल फोनच्या चार्जरची पिन तोंडात घालून चघळत असताना वीजेचा शॉक लागून एका चारवर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. कर्नाटकात चिक्कमंगळुरुमध्ये गुरुवारी ही दुर्देवी घटना घडली. अभिघनन असे मृत मुलाचे नाव आहे. मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी चार्जरची वायर ज्या इलेक्ट्रीक सॉकेटला जोडण्यात आलेली होती. त्या सॉकेटचे बटण बंद केलेले नव्हते. त्यामुळे ही दुर्घटना घडली.
अभिघननचे वडील सुतारकाम करतात. इलेक्ट्रीक सॉकेटला जोडलेली वायर लोबंकळत पडलेली होती. नुकताच आंघोळ करुन बाहेर आलेला अभिघनन ज्या खुर्चीवर उभा होता. त्याच्या बाजूलाच मोबाइल चार्जरची वायर लोंबकळत होती. अभिघननचे त्याकडे लक्ष गेले. त्याने ती वायर पकडली आणि तोंडात टाकली. विद्युत पुरवठा सुरु असल्यामुळे शॉक लागून तो जागीच कोसळला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्याची आई घरात एकटीच होती.
अभिघननच्या तोंडाच्या आत किंवा शरीराच्या बाहय भागावर कोणतीही जखम दिसत नव्हती असे पोलिसांनी सांगितले. ह्दय किंवा लिव्हरमुळे अभिघननचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी सांगितले. अभिघननला एमजी रुग्णालयात योग्य उपचार मिळाले नाहीत. उपचारांना उशीर झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे.
आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूमुळे इंद्रेश आणि लीला यांना प्रचंड धक्का बसला आहे. मोबाइल वापरणा-यांसाठी ही डोळे उघडणारी घटना असल्याचे चिक्कमंगळुरु पोलिसांनी सांगितले. अनेकदा आपण आपल्या घरात फोन चार्ज झाल्यानंतर मोबाइल काढून घेतो पण चार्जरची पिन गुंडाळून ठेवायची तसदी घेत नाही.