वाहनचालकांना मोफत चहा अन् आरामाची सुविधा; अपघात टाळण्यासाठी 'या' सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 07:40 AM2023-12-22T07:40:42+5:302023-12-22T07:42:03+5:30
बहुतांश रस्ते अपघात हे महामार्गावर होतात कारण ट्रक आणि अन्य वाहनचालकांना गाडी चालवताना डुलकी येते.
भुवनेश्वर - देशात दिवसेंदिवस रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढत चाललीय. दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. याच अपघातांना आळा घालण्यासाठी ओडिशा सरकारनं घेतलेल्या निर्णयाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. महामार्गावर चालणाऱ्या अवजड वाहनांचे अपघात रोखण्यासाठी ओडिशाचे परिवहन मंत्री तुकुनी साहू यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
ओडिशा सरकारनं रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या अवजड वाहनचालकांना मोफत चहा देण्याची सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश रस्ते अपघात हे महामार्गावर होतात कारण ट्रक आणि अन्य वाहनचालकांना गाडी चालवताना डुलकी येते. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने महामार्गावर मोफत चहा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री साहू यांनी माध्यमांना सांगितले.
याबाबत मंत्री तुकुनी साहू यांनी म्हटलं की, सर्व जिल्ह्यातील रस्ते परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावरील रस्त्याशेजारी असलेल्या हॉटेल, ढाबे यांची गणना करून तिथे वाहन चालकांना रात्रीच्या वेळी डुलकी लागू नये यासाठी मोफत चहा देण्याची सुविधा करा.इतकेच नाही तर त्यांच्या आरामाची सोयही राज्य सरकारकडून केली जाईल. पुढील वर्ष १ ते ७ जानेवारी काळात रस्ते सुरक्षा सप्ताहात मोफत चहा देण्याची तयारी सरकारने केली आहे.
भारतात रस्ते अपघात
जागतिक आरोग्य संघटनेद्वारे रस्ता सुरक्षेवर जारी आकडेवारीनुसार, जगभरात रस्ते अपघातात मृतांची संख्या दरवर्षी १.१९ मिलियन इतकी आहे. भारतात ही संख्या जास्त आहे. भारतात रस्ते अपघातात २०२२ च्या रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये १ लाख ५० हजार ७८५, वर्ष २०२१ मध्ये १ लाख ५३ हजार ७९२ इतकी मृतांची संख्या आहे. भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृतांची संख्या २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये १७ टक्क्यांनी वाढली होती. २०२१ मध्ये एकूण रस्ते अपघात ४ लाख ३ हजार इतके झाले होते. जे १ वर्षापूर्वी ३ लाख ५४ हजार इतके होते.