रेल्वेत मोफत मिळेल व्हिडियो ऑन डिमांड सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 01:57 AM2020-01-02T01:57:07+5:302020-01-02T06:52:01+5:30
प्रत्येक गाडीत वाय फाय स्पॉट; ओटीपी लागणार
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : रेल्वेत प्रवाशांना लवकरच व्हिडियो ऑन डिमांड सेवा मिळेल. प्रवाशांना हवे तेव्हा ते त्यांच्या डिव्हाईस आणि उपकरणावर त्यांच्या आवडीचा चित्रपट पाहू शकतील. ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे. यासाठी सगळ्या रेल्वेगाड्यांत वाय-फाय-स्पॉट लावले जातील.
रेल्वे बोर्डचे नवे अध्यक्ष व्ही. के. यादव म्हणाले की, यासाठी आम्ही खासगी कंपन्यांशी करार करण्याचे ठरवले आहे. लवकरच यासंदर्भात निविदा जाहीर केली जाईल यासाठीची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आहे.
यादव यांनी सांगितले की, प्रवाशांना या सेवेसाठी काहीही पैसे मोजावे लागणार नाहीत. रेल्वे गाड्यांत वाय-फाय स्पॉट लावले जातील. त्याद्वारे प्रवासी त्यांच्याकडील डिव्हाईस, उपकरणाला (उदा. टॅब आदी) जोडून आपल्या पसंतीचा व्हिडियो, चित्रपट व इतर कार्यक्रम पाहू शकतील. ही सेवा देणारी कंपनी जाहिरातीतून कमाई करील. कंपनी प्रवाशांकडून कोणतेही शुल्क घेणार नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात ही सेवा राजधानी, शताब्दी, दुरंतो आदी रेल्वेगाड्यांत सुरू केली जाईल. त्यानंतर इतर रेल्वेंतही ही सेवा मिळेल. आपल्या डिव्हाईसला वाय-फायने कनेक्ट करण्यासाठी प्रवाशांना एक केंद्रीयकृत नंबरवर संपर्क साधून ओटीपी मिळवावा लागेल. त्यानंतर ते त्यांच्या डिव्हाईसवर त्यांच्या आवडीचे व्हिडियो-कार्यक्रम ऑनलाईन पाहू शकतील.