हिमसागरपासून लंगडापर्यंत… ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींना पाठवले खास आंबे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 11:40 AM2023-06-08T11:40:55+5:302023-06-08T11:43:45+5:30
ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी आंबे पाठवण्यात आले.
कोलकाता : राजकीय मतभेद असतानाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातून खास जातीचे आंबे पाठवले आहेत. गेल्या 12 वर्षांच्या परंपरेनुसार या वर्षीही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान कार्यालयाला (PMO) आंबे पाठवले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी आंबे पाठवण्यात आले.
इंडिया टुडेने आपल्या सुत्राचा हवाला देत म्हटले आहे की, हिमसागर, फाजली, लंगडा आणि लक्ष्मण भोग यासह चार किलोग्रॅम आंब्याच्या विविध जाती सजावटीच्या पेटीत पंतप्रधानांच्या निवासस्थान 7, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली येथे पाठवण्यात आल्या आहेत. एक-दोन दिवसांत या आंब्याच्या पेट्या नवी दिल्लीत पोहोचतील.
याचबरोबर, सूत्राने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भारताचे सरन्यायाधीश (CJI) डी. वाय. चंद्रचूड यांनाही बंगालमधील विविध जातीचे आंबे पाठवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आंबे पाठवले होते.
दरम्यान, ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून कडू-गोड संबंध आहेत. 2019 मध्ये नरेंद्र मोदींनी खुलासा केला होता की, तृणमूल सुप्रिमोने दुर्गा पूजेच्या निमित्ताने त्यांना कुर्ता-पायजमा आणि मिठाई पाठवली होती. तसेच, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारसोबतच्या संवादात ते म्हणाले होते की, 'विरोधी पक्षांमध्ये माझे अनेक मित्र आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ममता दीदी अजूनही दरवर्षी माझ्यासाठी एक किंवा दोन कुर्ते पाठवतात.'